हे विश्वची माझे घर म्हणायला किती गोंडस, ऐकायला किती सुंदर मात्र या पृथ्वीवर प्रत्येक घरातील आयुष्य वेगळे जीवनमान वेगळे. कुठे भरभरून आहे तर कुठे संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत. कुठे लख्ख प्रकाश सर्व सोयी सुविधा तर कुठे काळाकुट्ट अंधार वीज रस्ता कोसो दूर.
मनमुक्त फाउंडेशन आयोजीत दुसरा उपक्रम सुधागड पाली पासून दूर डोंगर माथ्यावर जंगलात घायमाल पाडा, नेनावली आणि खाडसंबले आदिवासी पाडा येथे दिवाळीनिमित्त आयोजित केला होता. जिथे दिवाळी म्हणजे साखरेचं गोड धोड एवढंच माहीत असेल. अशा ठिकाणी पायपीट करतं जाऊन मनमुक्त फाउंडेशनच्या तरुण शिलेदारांनी भाऊबीज निमित्त प्रत्येक वस्तीवर घरोघरी जाऊन दिवाळी फराळ वाटप केला. त्यांच्या सोबत यावर्षीची दिवाळी साजरी केली.
आली माझ्या घरी ही दिवाळी , सप्तरंगात नाहूनी आली
आली माझ्या घरी ही दिवाळी !!
दिवाळी म्हणजे नवीन कपडे , फटाके, लायटिंग, दिवे आणि महत्वाचा भाग म्हणजे फराळ…
हे आपण सगळे दरवर्षी करतोच पण इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्षी ही दिवाळी माझ्याच नाही प्रत्येकाच्या घरी सप्तरंगात नाहुनी येईल असा वसा मनमुक्त परिवाराने घेतला आहे.
दिवाळी फराळ वाटप या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक घरी जाऊन दिवाळी भाऊबीज साजरी करताना त्या लोकांच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि ते स्मित हास्य जणू मनाला एक वेगळीच उभारी देणार होत.
खरचं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर येणारा आनंद कुठल्याही मापात मोजता येत नाही तर तो अनुभवायचा असतो. यासाठीच मनमुक्त ची निर्मिती झाली आहे.
तेथून निघताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद घेऊन निघालो मात्र त्यांच्या अंगावर घालायला पुरेसे कपडे नाहीत हे पाहून मन खिन्न झाल व निघालो ते पुन्हा परत येण्यासाठी.
दिवाळी सुंदर आहे, मज्जाच मज्जा !!
आयुष्य सुंदर आहे, मज्जाच मज्जा !!
जनसामान्यांच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी उभे राहणे सुंदर आहे, मज्जाच मज्जा !!