मनमुक्त फाउंडेशन आयोजीत तिसरा उपक्रम म्हणजे गरजूंना ब्लँकेट व कपडे वाटप कार्यक्रम शनिवार दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी पाली जवळच्या डोंगरावर रासाळ वाडी या आदिवासी पाड्यावर पार पडला.
शनिवार व रविवार २० व २१ नोव्हेंबर रोजी कोअर टीमची दोन दिवसीय कार्यशाळा ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशनच्या निसर्गरम्य प्रांगणात आयोजित केली होती. त्याअंतर्गत आदिवासी पाड्यावर नविन ब्लँकेट व कपडे वाटपच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. नामदेव भोसले व डॉ. राजेंद्र कुऱ्हाडे यांचे कोच कै. तानाजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सायली पाटील यांनी ब्लँकेट वाटप करण्याचे
योजिले होते. तसेच आम्ही सर्व कोअर टीम सदस्यांनी जमा केलेले जुने वापरायोग्य कपडे पाड्यावर वाटप करण्याचे योजिले होते.
त्यानुसार मनमुक्त फाउंडेशनच्या तब्बल ४० सदस्यांचा ताफा सर्व कपड्यांचे गाठोडे खांद्यावर घेऊन सायंकाळीं ५ वाजता रासाळ वाडी या पाड्यावर पोहोचला. पाड्यावरील सर्व लहान थोर बायका मुलांना चावडीवर जमा करण्यात गावातीलच एक सक्रिय कार्यकर्ते श्री. केतन यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व साहित्य गावच्या ग्रामपंचायत ऑफिस मध्ये ठेवण्यात आले व एक एक करून गावातील सर्व कुटूंब प्रमुखाच्या हाती नावनिहाय आमच्या संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सौ. सखुबाई कुऱ्हाडे (वहिनी) यांच्या हस्ते लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा च्या जयघोषात सोपविण्यात आले. सोबत डॉ. नामदेव भोसले यांच्या हस्ते बिस्कीट वाटप करण्यात आले. संपूर्ण गाव म्हणजे जवळ जवळ १०० महिला पुरुष व लहान मुले मिळून चावडीवर जमा होती. जणू काही आनंद मेळावाच. मनमुक्त फाउंडेशनच्या ४० दिलखुलास, सकारात्मक, प्रसन्न चेहऱ्याच्या शिलेदाराना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते. डॉ. नामदेव भोसले यांनी जगण्याचे सुंदर गाणे बोलून सर्वांना मज्जाच मज्जा म्हणायला लावून सर्व वस्तीवर स्फूर्ती निर्माण केली.
अंधार पडायला लागल्यावर जुने कपडे प्रत्येक घरी पोहोचवण्याची जबाबदारी श्री. केतन यांच्यावर सोपवून मनमुक्त फाउंडेशनचे सर्व शिलेदार अंधार पडताच डोंगरावरून पायथ्याशी आले व पालीस रवाना झाले.
नविन ब्लँकेट व कपडे मिळाल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या होत्या. तो क्षण व पाड्यावरील दृश्य विलोभनीय होत.
रासाळ वाडी सुंदर आहे, मज्जाच मज्जा !!
आयुष्य सुंदर आहे, मज्जाच मज्जा !!
जनसामान्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुंदर आहे, मज्जाच मज्जा !!